Home Cities जळगाव ई-पिक पाहणीसाठी अंतिम संधी : शेतकऱ्यांनी 20 सप्टेंबरपूर्वी नोंदणी पूर्ण करावी –...

ई-पिक पाहणीसाठी अंतिम संधी : शेतकऱ्यांनी 20 सप्टेंबरपूर्वी नोंदणी पूर्ण करावी – रोहित निकम यांचे आवाहन

0
127

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगाम 2025-26 साठी केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली असून, ही अंतिम संधी असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या हंगामात केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार मुग, उडीद, सोयाबीन व तुर अशा कडधान्य व तेलबियांची खरेदी नाफेड व एनसीसीएफ (NCCF) या संस्थांच्या माध्यमातून केली जाणार आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य पणन महासंघामार्फत राबवली जाणार असून ती पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी अचूक व वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

ई-पिक पाहणीसाठी 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत शेतकरी स्तरावरून मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध होती. मात्र, राज्यातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि दुबार पेरणीसारख्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी स्तरावरून ई-पिक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत 20 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. यानंतर 21 सप्टेंबर ते 4 नोव्हेंबर 2025 या कालावधीत उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सहायक स्तरावरून पूर्ण केली जाईल.

पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी सांगितले की, “केंद्र शासनाच्या आधारभूत दर खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी ही ई-पिक पाहणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 7/12 उताऱ्यासह ऑनलाईन नोंदणी झाल्यासच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी हमीभाव मिळू शकतो. त्यामुळे कोणताही शेतकरी ही संधी गमावू नये. या मुदतवाढीचा योग्य उपयोग करून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तातडीने पूर्ण करावी.”


Protected Content

Play sound