
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या सौ. रजनीताई संजय सावकारे यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. शहरात तसेच प्रभाग पातळीवर जनसमर्थन वाढत असताना, गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेली भाजप-शिवसेना-रिपाइं-लहुजी शक्ती सेना महायुतीची भव्य प्रचार रॅली हे निवडणूक वातावरणातील महत्त्वाचे आकर्षण ठरले.

प्रभाग क्रमांक १४ मधील राजूभाऊ आवटे यांच्या घराजवळील प्रारंभ स्थळापासून निघालेल्या या रॅलीने गांधीनगर परिसरात उत्साहाची लाट निर्माण केली. वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला अधिक जोम मिळाला. उमेदवार राजेंद्र आवटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय राहिला. रेल्वे विभागातून येणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाला विशेष बळ दिले.
भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीतील सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध आघाडी-मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या उत्साहात ही रॅली परिसरातून मार्गक्रमण करत असताना नागरिकांच्या कडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात पक्षाच्या धोरणांची माहिती देतानाच नगराध्यक्षपदासाठी रजनीताई सावकारे यांच्या निवडीचे कारणही मतदारांसमोर ठळकपणे मांडले.
ही रॅली संपल्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील काही दिवसांत प्रत्येक प्रभागात घराघरात जाऊन जनसंपर्क वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. भुसावळमधील निवडणूक चुरशीची असली तरी संघटीत शक्ती आणि विकासाभिमुख भूमिका नागरिकांसमोर स्पष्टपणे मांडल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास महायुती कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



