भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आज आपल्या उमेदवारांसाठी भव्य प्रचार रॅली काढून वातावरण तापवले. अनुसूचित जाती महिला राखीव नगराध्यक्षपदासाठी कविता प्रविण सुरवाडे आणि वार्ड क्रमांक 16 मधून शेख जमील अमीर व मेमन नजमा अंजुम यांच्या प्रचारार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

रॅलीला सुरुवात होताच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. काँग्रेसच्या महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने रॅलीला जोशपूर्ण वातावरण लाभले. जळगावचे फारुख शेख, सलीम शेख चुडीवाले आणि मुनवर खान यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला बळ मिळाले.

प्रचार फेरीदरम्यान खडका रोडवरील जाम मोहल्ला, शिवाजीनगर या भागांमधून रॅली उत्साहात काढण्यात आली. ढोल-ताशांचा नाद, घोषणांचा आवाज आणि उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत विकासाचा संकल्प मांडला.
रॅलीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांची माहिती देत स्थानिक पातळीवरील विकासकामांचा आढावा नागरिकांसमोर ठेवला. उमेदवारांनी जनतेच्या समस्या नीटपणे ऐकून घेतल्या आणि त्या निवडून आल्यास प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.



