Home क्राईम  बनावट देशी दारूचा मोठा कारखाना उद्ध्वस्त;  ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

 बनावट देशी दारूचा मोठा कारखाना उद्ध्वस्त;  ४० लाखांचा मुद्देमाल जप्त


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी आज दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी मोठी कारवाई करत तब्बल ४० लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पारोळा पोलिसांनी ही शिताफीने कारवाई केली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादरपूर गावाजवळील बोरी नदीच्या किनाऱ्यावर एक लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये टँगो पंच नावाच्या बनावट देशी दारूचा अवैध कारखाना सुरु असल्याची पुष्टी झाली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर-पवार यांच्या सूचनेनुसार व उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली.

पोलिस पथकासोबत दोन शासकीय पंच घेत अवैध दारू कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी तयार आणि तयार होण्याच्या प्रक्रियेत असलेली मोठ्या प्रमाणात देशी दारू, कच्चा माल, यंत्रसामग्री, वाहने आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.

कारखान्यात तयार विक्रीसाठी ३१०० सीलबंद बाटल्या (किंमत ₹1.24 लाख), ७०० विक्रीपूर्व अवस्थेतील बाटल्या (₹28,000), ८०० लीटर स्पिरीट (₹3.55 लाख), १५०० लीटर तयार दारू (₹3 लाख), RO व CNC मशिन्स (प्रत्येकी ₹5 लाख), पाणी लिफ्टिंग मशीन, इलेक्ट्रिक स्टॅबिलायझर, ३० हजार टँगो पंच बुच, ६१,२०० रिकाम्या बाटल्या (₹6.12 लाख), विविध आकाराच्या पाण्याच्या टाक्या, मिक्सर मशीन, इलेक्ट्रिक स्टार्टर्स, बोलेरो मालवाहू वाहन (₹5 लाख), स्विफ्ट डिझायर कार (₹5 लाख) तसेच लोखंडी पत्र्याचे ४० बाय ४० फुटांचे शेड (₹5 लाख) असा एकूण ₹40,33,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक अमोल दुकळे, पोलीस हवालदार व अंमलदार महेश पाटील, शरद पाटील, प्रविण पाटील, अनिल राठोड, अजय बाविस्कर, आकाश माळी, विजय पाटील, शेखर साळुंखे आणि चालक पोह. संजय पाटील व वेलचंद पवार यांच्या संयुक्त पथकाने केली.

पारोळा पोलीस ठाण्याची ही कारवाई अवैध दारू निर्मिती आणि वितरणाच्या विरोधात मोठा दणका मानला जात असून, स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांवर प्रभावी कारवाईचा इशारा या घटनेतून मिळाला आहे.


Protected Content

Play sound