पुणे–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील जमीन घोटाळ्यांची मालिका थांबताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमिनीशी संबंधित घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच, आता पुणे जिल्ह्यातून आणखी एका मोठ्या जमीन प्रकरणाची माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची 15 एकर शासकीय जागा परस्पर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, संबंधित विभागांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील सर्वे नंबर 20 मध्ये असलेली ही जमीन पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची आहे. मात्र, या विभागाला पूर्ण अंधारात ठेवून, जानेवारी 2025 मध्ये हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने ही 15 एकर जमीन परस्पर विकली आहे. या विक्री व्यवहाराची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याची चर्चा आहे. सर्वाधिक आश्चर्याची बाब म्हणजे, या व्यवहाराबाबत पशुसंवर्धन विभागाला काहीच माहिती नव्हती.

मुद्रांक शुल्क विभागाकडून ही जमीन विक्रीची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाल्यानंतर, त्यांनी तत्काळ या प्रकरणाची तक्रार पुण्याचे विभागीय आयुक्तांकडे केली. त्यानंतर पुणे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाने स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासानुसार, शासकीय जमीन खाजगी व्यक्तींनी विक्री केल्याचे स्पष्ट झाले असून, या व्यवहारामागे कोणते हात आहेत हे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तुलना नुकत्याच चर्चेत असलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या 1800 कोटींच्या जमिनीच्या प्रकरणाशी केली जात आहे. तिथेही अवघ्या 300 कोटींना जमीन खरेदी करून केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा आरोप आहे. आता ताथवडे प्रकरण समोर आल्यानंतर, पुण्यातील जमीन व्यवहारांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासकीय मालकीची, कोट्यवधींची जमीन अशा प्रकारे लाटली जाणं हे राज्याच्या महसूल व प्रशासन यंत्रणेसाठी चिंताजनक ठरत आहे. चौकशीत नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा व्यवहार झाला, तसेच कोणत्या स्तरावर हा प्रकार दडपला गेला, याचा तपास लवकरच निर्णायक टप्प्यात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.



