Home क्राईम बनावट दस्तऐवजाद्वारे येथील जागा हडपली, १ कोटीची खंडणी मागितली

बनावट दस्तऐवजाद्वारे येथील जागा हडपली, १ कोटीची खंडणी मागितली


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ओंकार नगर येथील एका वकिलाच्या प्लॉटवर बनावट दस्तऐवजांच्या आधारे जिल्हापेठ येथील जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर, ही जागा खाली करण्यासाठी संबंधित आरोपींनी वकिलाकडे तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी शनिवारी (२८ जून) दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विमल आत्माराम वाणी, तुषार आत्माराम वाणी आणि श्रीकांत आत्माराम वाणी (सर्व रा.जळगाव ) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील ओंकार नगरात राहणारे ॲड. पंकज पांडुरंग काळे (वय ४७) यांच्या वडिलांनी जिल्हापेठमधील टी.पी. स्कीम क्रमांक २ मधील प्लॉट क्रमांक २६९ विकत घेतला होता. या प्लॉटच्या बाजूला असलेल्या प्लॉट क्रमांक २६५ मधील रहिवासी विमल आत्माराम वाणी यांनी १४ फेब्रुवारी १९८० रोजी घर खरेदी केले. त्यांच्या खरेदी खतात त्यांनी केवळ ६३.८ एवढी जागा खरेदी केली होती. मात्र, १८ एप्रिल १९८० रोजी वाणी कुटुंबियांनी बनावट दस्त तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली आणि प्लॉट क्रमांक २६५ चे क्षेत्रफळ ५७७.७ असे वाढवून दाखवले.

याच बनावट दस्ताच्या आधारे वाणी कुटुंबियांनी ॲड. काळे यांच्या प्लॉट नं. २६९ च्या जागेवर अतिक्रमण करत बेकायदेशीर बांधकाम केले. ॲड. काळे यांनी विचारणा केली असता, तुषार वाणी आणि श्रीकांत वाणी यांनी ‘जागा खाली करतो, पण त्यासाठी १ कोटी रुपये द्यावे लागतील,’ अशी खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून ॲड. पंकज काळे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करत आहेत.


Protected Content

Play sound