यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनींचे भूसंपादन करण्यास अखेर अधिकृत अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यांतील १०५० शेतकऱ्यांच्या मालकीच्या ३४२.७८४ हेक्टर शेती क्षेत्रावर ही अधिसूचना लागू होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ही अधिसूचना केंद्र शासनाच्या राजपत्रात १३ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. या प्रकल्पासाठी आधीच फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाच्या प्रस्तावानुसार संबंधित शेतकऱ्यांकडून वैयक्तिक हरकती मागविण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेदरम्यान रावेर तालुक्यातील सुमारे ५०० ते ५५० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आपले आक्षेप आणि हरकती सादर केल्या होत्या.

राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून अखेर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिनियम १९५६ च्या कलम ३(क) अन्वये अंतिम अधिसूचना जारी केली आहे. यामुळे चौपदरीकरणाच्या कामांना कायदेशीर मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष भू संपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे.
या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर, जलद व सुरक्षित होणार असून तीन राज्यांतील आर्थिक व व्यापारी संबंध मजबूत होणार आहेत. तथापि, ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यांच्यामध्ये मोबदल्याच्या दरावरून अजूनही नाराजी आहे. अनेक शेतकरी अद्यापही सरकारकडून योग्य आणि न्याय्य मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, या संदर्भात महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वय महत्वाचा ठरणार आहे.



