रांची/पाटणा (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणूक निकालानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी एकवेळचे जेवण सोडले आहे. लालूप्रसाद सध्या रांचीत आरआयएमएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुपारचे जेवण सोडल्याने लालूप्रसाद यांची प्रकृती ढासळत चालली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
लोकसभेच्या बिहारमधील ४० जागांपैकी ३९ जागांवर एनडीएचे उमेदवार निवडून आले आहेत. लालूप्रसाद यांच्या आरजेडीला खातंही उघडता आलेले नाही. निकालानंतर लालूप्रसाद यांनी जेवण सोडले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ‘लालूप्रसाद यांची दैनंदिनी पूर्णपणे बदललेली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते सकाळी पोटभर नाश्ताही करत नाहीत तर दुपारी जेवत नाहीत. सकाळी नाश्ता केल्यानंतर थेट रात्रीच थोडेसे जेवतात. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देणंही कठीण झाले आहे,’ असे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी म्हटले आहे.
लालूप्रसाद यांची आम्ही समजूत काढत आहोत. दुपारी जेवण न करणे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. वेळेवर जेवण केले नाही तर त्यांना औषधं आणि इन्सुलिन देणे कठीण होणार आहे. दैनंदिनीत सुधारणा न झाल्यास ब्लड आणि शूगर लेव्हलवर परिणाम होऊ शकतो, असेही डॉक्टरांचे म्हटले आहे.