बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील सोनोटी या गावात भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून एकदाही बस पोहोचलेली नाही. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने अखेर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सोनोटी गावात बस दाखल झाली. यावेळी ग्रामस्थांनी बस चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला.
विभागीय नियंत्रकांनी केलेल्या सर्व्हेत नाडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील सोनोटी रस्त्यावर वाहनाला वळण घेता येत नसल्याने हा रस्ता डेन्जर झोन मध्ये टाकण्यात आल्याच्या लेखी सुचना बोदवड बसस्थानक व्यवस्थापकांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या प्रकारामुळे सोनोटी गावात अद्याप बस सेवा पोहोचली नव्हती. बोदवड हून डायरेक्ट जुनोना व जुनोन्यावरुन डायरेक्ट बोदवड अशी बस फेरी सुरु होती. यामुळे नाडगाव येथील के.जी. पाटिल हायस्कूल मध्ये 1 ली ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पायी जावे लागत होते. तर , बोदवड येथे कनिष्ठ व उच्च महा विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते.
यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांकडे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाण्याचा आग्रह धरला. “आमदारांनी एका फोन मध्ये प्रश्न सोडवितात मग आपल्या बसचा ते प्रश्न सोडवू शकत नाही का .?” असा प्रश्न उपस्थित केला. जो पर्यंत आमदार चंद्रकांत पाटिल यांची भेट होत नाहि , तोपर्यंत शाळेत जाणार नाही अशी भुमिका बाल विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे सायंकाळी ४० ते ५० विद्यार्थी आमदारांना भेटण्यासाठी निघण्यापूर्वी त्यांना फोन लावुन येत असल्याबाबत सांगितले असता , तुम्ही नाहक त्रास करुन बाल विद्यार्थ्यांना घेऊन भेटायला येऊ नका , मी बस लगेच सुरु करायला लावतो असे सांगितले. दुसर्याच दिवशी विभागीय नियंत्रक, जाळगव यांनी बस घेउन नाडगाव रेल्वे स्टेशन सोनोटी रोड वर ट्रायल घेतल्यानंतर सदरील रस्ता महामंडळाकडून डेन्जर झोन मधून काढण्यात आला. बोदवड हून डायरेक्ट जुनोन्यावरुन जाणारी बस आता बोदवड – नाडगांव- सोनोटी – उजनी मार्गे जुनोना असा परतीचा प्रवास करणार आहे. आज दिनांक 30 रोजी बसची पहिली फेरी झाली. हि फेरी सुमारे १९४७ नंतर पहिल्यांदाच सुरू झाल्याने बस हाऊसफुल्ल झाली. ग्रामस्थ व के.जी. पाटिल हायस्कूल नाडगांव येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी चालक व कंडक्टर यांचे रुमाल टोपी देउन स्वागत केले तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.
के.जी. पाटिल हायस्कूल शाळेची १९८३ रोजी स्थापना झालेली आहे. या गेल्या ४० वर्षात एकदाही बस सोनोटी गावात गेलेली नाही. आता या निर्णयामूळे कायमचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी प्रतिक्रीया नाडगाव येथील के.जी. पाटील हायस्कूलचे चेअरमन किशोर पाटील यांनी दिली.