जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात आता मोठी रंगात आली आहे. प्रभाग क्रमांक ३ ‘ड’ मधील सर्वसाधारण गटाचे अपक्ष उमेदवार ललित विजय नारखेडे यांनी मंगळवार, ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. जळगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन आणि विजयाचा संकल्प करत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला.

दिग्गजांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन :
याप्रसंगी ललित नारखेडे यांच्यासोबत मानव अधिकारी परिषदेचे अध्यक्ष सुरज विजय नारखेडे, माजी पंचायत समिती सभापती विजय ओंकार नारखेडे, भादली बुद्रुकचे माजी सरपंच जितेंद्र ओंकार नारखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उपस्थित होता. रॅलीदरम्यान समर्थकांनी दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण प्रभाग दणाणून गेला होता.

‘छताचा पंखा’ हीच निशाणी, विकास हाच ध्यास प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना ललित नारखेडे म्हणाले की, “माझ्यासाठी राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम आहे. पद असो वा नसो, मी आजवर प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीला धावून गेलो आहे. याच विश्वासाच्या जोरावर मी ‘छताचा पंखा’ ही निशाणी घेऊन अपक्ष म्हणून मैदानात उतरलो आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, हाच माझा मुख्य संकल्प आहे.”
विकासाचा ‘ब्लूप्रिंट’ सादर :
ललित नारखेडे यांनी आपल्या भाषणात प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “निवडून आल्यावर रखडलेले रस्ते, गटारी आणि स्वच्छतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. केवळ मूलभूत सुविधाच नव्हे, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्कासाठी मी संविधानिक मार्गाने लढा देत राहीन.”
सामाजिक बांधिलकीवर भर:
अनन्याविरुद्ध लोकशाही मार्गाने आवाज उठवणारा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे. आगामी काळात प्रभागातील सामाजिक वातावरण सकारात्मक ठेवण्यासोबतच, तळागळातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग ३ ‘ड’ मधील निवडणुकीची चुरस अधिकच वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



