मुंबई प्रतिनिधी । सह्याद्री अतिथी गृहात आज दि. 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. येथील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा मंडळाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत जाहिर करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश देण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. तसेच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत गणपती आगमनाची लगबग सुरु झाली आहे. आज सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यात गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तर दुसरीकडे अन्य गणपती मंडळांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी दिला आहे. लालबागमधील गणेशगल्ली मुंबईच्या राजाकडून 3 लाखांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आणि चिंचपोकळीतील चिंतामणी गणपती मंडळातून मुख्यमंत्र्यांना 5 लाखांचा निधी देण्यात आला आहे.
पोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करावे. तसेच पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती भूमिका घ्यावी. गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू, असेही फडणवीस यांनी सांगितले.