Home राजकीय ‘देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : मुख्यमंत्री

‘देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : मुख्यमंत्री


परभणी-वृत्तसेवा | आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी व ठाम घोषणा केली आहे. परभणी दौऱ्यावर असताना आयोजित सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.”

सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजपला मोठे बहुमत मिळाल्यानंतर काही लोकांनी योजना बंद होईल, अशा अफवा पसरवल्या. मात्र प्रत्यक्षात एकही योजना बंद झालेली नाही. “लाडक्या बहिणींना केवळ लाभार्थी म्हणून ठेवायचे नाही, तर त्यांना लखपती दीदी बनवायचे आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रात ५० लाख महिलांनी ‘लखपती दीदी’चा टप्पा पार केला आहे. परभणी जिल्ह्यातूनच एक लाख महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. “या वर्षी राज्यात एक कोटी लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, महापौर पदावर निवडून आलेल्या प्रतिनिधीला एक वर्षानंतर भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. “पहिला आढावा हा याच गोष्टीचा असेल की, किती लाडक्या बहिणींना लखपती बनवण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.

परभणीच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांना थेट इशारा देताना मुख्यमंत्री म्हणाले, “या शहराच्या विकासाच्या आड जो कोणी येईल, त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.”

इतिहास आणि भविष्य यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, इतिहासाचा सन्मान आवश्यक आहे, मात्र भविष्य घडवण्याची जबाबदारी आजची आहे. “इतिहासात जगणारे इतिहासातच अडकतात. भविष्याचा मार्ग आपल्यालाच कोरावा लागतो,” असे ते म्हणाले.


Protected Content

Play sound