मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूक निकालांना ‘कलाटणी’ देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेलाच सरकार कलाटणी देणार असल्याची सध्या चर्चा आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, खरंच अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून केला जात आहे. मात्र यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहिण योजनेचा जीआर काढला त्यावेळी त्यात काही नियम दिले गेले होते. त्या नियमानुसारच सर्व महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचा दावा आदिती तटकरे यांनी केला आहे. सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच लाडकी बहिण योजनेचे पैसे देण्यात आले असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
लाडक्या बहिणी संदर्भात नियम बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. एका घरातल्या केवळ दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल, अशा प्रकारचा कोणताच नियम नसल्याचे देखील तटकरे यांनी म्हटले आहे. राज्यांमध्ये अडीच कोटी पर्यंत लाभार्थी असू शकतात, असे आम्ही सुरुवातीपासून म्हटले होते. सध्या दोन कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे आपण त्या आकड्याच्या जवळपासच असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.