मुंबई-वृत्तसेवा | देश डिजिटल युगाकडे वेगाने वाटचाल करत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनात्मक साहित्य मराठी भाषेत अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याची बाब समोर आली आहे. इंग्रजी भाषेत मोठ्या प्रमाणावर संशोधन निबंध, संदर्भग्रंथ आणि अभ्यास साहित्य उपलब्ध असले तरी त्यांचे मराठी भाषांतर किंवा स्वतंत्र मराठी संशोधनग्रंथ फारच कमी असल्याने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना ही समस्या अधोरेखित केली. त्यांच्या मते, मराठी माध्यमातून विज्ञान किंवा तंत्रज्ञानाचे शिक्षण घेताना सर्वप्रथम संशोधनात्मक पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का, याचा शोध घ्यावा लागतो. अनेकदा इंग्रजीतील संशोधनपर साहित्य समजून घेणे कठीण जाते. इंटरनेटवरही सर्व संदर्भग्रंथ सहज उपलब्ध नसतात. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांवरील दर्जेदार, संशोधनाधिष्ठित आणि समजण्यास सोपी पुस्तके मराठीत उपलब्ध व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मराठी भाषेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांवरील पुस्तकांचे प्रमाण कमी असण्यामागे काही मूलभूत कारणे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सतत नवीन संकल्पना, संशोधन आणि तांत्रिक शब्दांची भर पडत असते. या संकल्पनांशी सुसंगत असा मराठी शब्दसंच विकसित करण्यात आपण अजूनही मागे असल्याचे प्रकाशन क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
सुनिधी पब्लिशर्सचे अविनाश काळे यांनी सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो एक विचारसरणी आणि दृष्टिकोन आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कितपत रुजवला गेला आहे, हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज असली तरी तो अजूनही मर्यादित प्रमाणात दिसून येतो.
तसेच मराठी भाषिक समाजात संशोधक आणि वैज्ञानिकांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने त्या अनुषंगाने मराठीत लेखनही मर्यादित राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या मराठी विद्वानांनी पुढाकार घेतल्यास आणि प्रकाशन क्षेत्राने त्याला प्रोत्साहन दिल्यास मराठीत दर्जेदार संशोधनात्मक साहित्याची निर्मिती वाढू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
एकूणच डिजिटल युगात ज्ञानसंपदा सर्वांसाठी उपलब्ध व्हावी, यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान विषयक दर्जेदार आणि अद्ययावत साहित्य मराठी भाषेत तयार होण्याची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले आहे.



