जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात माता पालक संघातर्फे मकर संक्रांतीनिमित्त ‘मातृ प्रबोधन’ आणि ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, २३ जानेवारी रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात जवळपास २५० माता पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सनातन धर्म प्रसारक क्षिप्रा प्रशांत जुवेकर यांनी उपस्थित मातांना विद्यार्थी संस्कारांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध स्लाईड्स आणि व्हिडिओ दाखवून त्यांनी मुलांवर संस्कार कसे करावेत, हे प्रभावीपणे पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान विद्यालयाच्या समन्वयिका विजयालक्ष्मी परांजपे यांनी भूषविले व्यासपीठावर संस्थेच्या मुख्य समन्वयिका पद्मजा अत्रे, समन्वयिका विजयालक्ष्मी परांजपे, रेवती शेंदुर्णीकर आणि पर्यवेक्षिका रमा तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख रोहिणी प्रचंड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनीषा वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.
आभार योगिता गवलकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे आणि पर्यवेक्षिका रमा तारे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.



