ला. ना. हायस्कूल १९८८ बॅचचे ममुराबाद येथे स्नेहमेळावा, मैत्री व पर्यावरण संवर्धनाचा संदेश


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ला. ना. हायस्कूलच्या १९८८ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर ममुराबाद येथील एका फार्महाऊसवर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल चार दशके उलटून गेल्यानंतरही मैत्रीचे नाते घट्ट ठेवत सुमारे ४० माजी विद्यार्थी या स्नेहमेळाव्यासाठी एकत्र आले होते. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देत आपुलकीचा संवाद आणि हास्यविनोदाचा आनंद लुटण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत मित्रांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सर्व मित्रांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त गोदावरीचे राहुल कुलकर्णी, सुरेंद्र मेहेंदळे, मनोज नागला, गोपाळ पाटील, गणेश भोळे, राजेश पाटील तसेच खगोलशास्त्रज्ञ अमोघ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करत ‘मैत्रीचे रोपटे’ लावण्यात आले. या उपक्रमातून मैत्रीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

पर्यावरणपूरक विचारांना अधिक बळ देताना प्लास्टिक ब्रशला विघटन होण्यासाठी सुमारे ४०० वर्षे लागतात, तर बांबूपासून तयार केलेला ब्रश केवळ सहा महिन्यांत नैसर्गिकरित्या विघटित होतो, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित मित्रांना बांबू ब्रशचे वाटप करण्यात आले आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमात उत्साह टिकवण्यासाठी अंताक्षरी, क्विझ, संगीत तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये सर्वांनी मनमुराद सहभाग घेत वातावरण अधिकच रंगतदार बनवले. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ८८ बॅचने आपल्या मातृसंस्थेसाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार करत ला. ना. हायस्कूलसाठी सामूहिक योगदानाचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून, शाळेच्या उन्नतीसाठी आगामी महिन्यात ठोस प्रकल्प निश्चित करण्याचे ठरवण्यात आले आहे.