मुंबई प्रतिनिधी । चेंबूरममधील बेपत्ता मुलीचा पोलिसांनी शोध न घेतल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने रास्तारोको, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड करून कुर्ला-चेंबूर येथे जोरदार आंदोलन केले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, सरकारी मालमत्तेचे नुकसान, घातक शस्त्रांनी मारहाण अशा वेगवगेळ्या कलमांनुसार सुमारे २०० आंदोलकांवर चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले तर ३३ लोकांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेपत्ता मुलीचा शोध न घेतल्याने तिच्या वडिलांनी निराशेपोटी आत्महत्या केल्याची घटना काल २२ ऑक्टोबर या दिवशी घडली. या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने मंगळवारी कुर्ला-चेंबूर परिसरात जोरदार आंदोलन केले होते. अंत्ययात्रेदरम्यान संतप्त जनसमुदायाने पोलिसांवर दगडफेक केली होती. वाहनांची तोडफोड करीत या जमावाने चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोकोही केला. आंदोलनकर्ते अधिकच हिंसक बनत असल्याचे पाहून अतिरिक्त कुमक मागवून पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता.
यामुळे केली वडिलांनी आत्महत्या
चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणाऱ्या पंचाराम रिठाडिया (४०) यांची १७ वर्षीय मुलगी सुमारे सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली. याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने तिचे अपहरण केल्याचा पंचाराम यांना संशय होता. याबाबत त्यांनी नेहरूनगर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र अनेक दिवस उलटूनही या मुलीचा शोध लागला नव्हता. त्यातच आरोपीचे कुटुंबीय धमकी देत असल्याचा आरोप पंचाराम यांनी केला होता. रोजच्या त्रासाला कंटाळून पंचाराम यांनी १३ ऑक्टोबरला रात्री टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरात लोकलखाली उडी घेत आत्महत्या केली.
यानंतर जमावाचा तीव्र संताप
या घटनेनंतर कुर्ला, चेंबूर परिसर आणि विशेषतः राजस्थानी रेगर समाज राहत असलेल्या ठक्कर बाप्पा कॉलनीत संतापाचे वातावरण होते. पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. रेगर समाजाने पोलिसांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी तसेच आरोपींना अटक करावी या मागणीसाठी या परिसरातील चप्पल बाजार आणि कारखाने अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा रेगर समाजाने घेतला होता. मात्र घटनेला बरेच दिवस झाल्याने पोलिसांनी रेगर समाज आणि रिठाडिया कुटुंबीयांची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
रास्तारोको, दगडफेक-हिंसक वळण
तणावपूर्ण वातावरणात दुपारी दोनच्या सुमारास पंचाराम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. मुंबई तसेच मुंबईच्या बाहेरून पाच ते सहा हजारांचा जनसमुदाय या ठिकाणी जमा झाला. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या अंत्ययात्रेला पुढे हिंसक स्वरूप आले. जमावाने चेंबूर-कुर्ला रस्ता पूर्णपणे बंद केला. परिणामी पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पोलिसांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. समजूत काढण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाच जमावाने लक्ष्य केले. दगड, चपला, बॉक्स जे काही हातात मिळेल ते पोलिसांच्या दिशेने भिरकावण्यात येत होते. पोलिसांची तसेच खासगी वाहने आणि एसटी बसची तोडफोड देखील या जमावाने केली. वाटेत जे काही मिळेल त्याची नासधूस केली जात होती. ठक्कर बाप्पा कॉलनी ते चेंबूरच्या चरई स्मशानभूमीपर्यंत हा उद्रेक सुरू होता.