जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात क्षत्रिय महाराजा खेतसिंह खंगार यांची जयंती मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात साजरी करण्यात आली. क्षत्रिय महाराजा खेतसिंह खंगार उत्सव समिती, जळगाव यांच्या वतीने आयोजित या जयंती सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
या निमित्ताने पंचमुखी हनुमान मंदिर ते जोशीपेठ या मार्गावर भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत महिला, पुरुष, युवक, युवती तसेच आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषाने संपूर्ण मार्ग जल्लोषात न्हाऊन निघाला होता.

शोभायात्रेतील विशेष आकर्षण म्हणजे महाराजा खेतसिंह खंगार यांच्या वेशभूषेत सजलेली एक बालिका घोड्यावर स्वार झालेली दिसून आली. या दृश्याने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले असून अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात हे क्षण टिपले. ऐतिहासिक परंपरा आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या वेशभूषेमुळे शोभायात्रेचा गौरव अधिकच वाढला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षत्रिय महाराजा खेतसिंह खंगार उत्सव समितीचे अध्यक्ष विजय गव्हाळे, उपाध्यक्ष देवेंद्र हर्दे, सचिव प्रेम मगरे, दत्तात्रेय चौधरी यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले. समितीच्या सदस्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबविल्याने जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला.
महाराजा खेतसिंह खंगार यांच्या शौर्य, पराक्रम आणि सामाजिक योगदानाची आठवण करून देणारा हा जयंती उत्सव नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून समाजात एकात्मतेचा संदेश देणारा ठरला आहे.



