अमळनेर (प्रतिनिधी ) बोरी नदीवरील फापोरे पाटचारी, पिंपळे नाला ते पार पाझर तलावपर्यंत झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आपल्या यंत्रणे मार्फत सहकार्य मिळणेबाबत अशी मागणी मौजे फापोरे, पिंपळे नाला, धार पाझर तलाव बचाव, कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
बोरी नदीवरील ब्रिटीश कालीन बंधारा, फापोरे पाटचारी, पिंपळे नाला ते धार पाझर तलावपर्यंत पावसातील पाणी व नदीतील पाणी पाटचारीव्दारे पाझर तलावात पोहचणार आहे. त्यामुळे सुमारे १५ गावांचा पाणी पिण्याचा व शेती सिंचनासाठी लागणारे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सदर काम हे लोकवर्गणी व सर्व गावातील लोकांनी लोकसहभाग घेवून पाटचारीचे काम सुरु करण्यात आले आहे. परंतु, पाटचारी व पिंपळे नाल्यालामध्ये बरेच मोठया प्रमाणावर शेतकरी, बिल्डर्स व स्थानिक रहिवाशी यांनी अतिक्रमण केलेले आहे. या अतिक्रमणामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होवून ते धार पाझर तलावापर्यंत पोहचु शकत नाही. म्हणून हे अतिक्रमण व अडथळा दूर करण्यासाठी तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना तसे आदेश दयावेत. आपल्या स्तरावरुन कर्मचारी व यंत्रणा पुरवुन सदरचे अतिक्रमण काढून आमच्या कामास सहकार्य करावे असे निवेदन फापोरे पिंपळे नाला धार पाझर तलाव बचाव कृती समितीचे प्राध्यापक गणेश पवार, सचिन पाटील ,राहुल पाटील, हिंमत पाटील, सतीश पाटील, अनंत निकम व काटे यांनी केले आहे.