पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रूक येथील प्रगतीशिल शेतकरी व पुरोगामी विचाराचे सामाजिक कार्यकर्ते विश्वास आनंदा पाटील ऊर्फ जिभाऊ ठाकरे यांना राजनंदिनी संस्थेतर्फे कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
विश्वास पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग केले. त्यामुळे ते भरघोस उत्पन्न घेत असून त्यांची यशोगाथा व समाजोपयोगी विचारसरणी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या पुरस्काराचे लवकरच वितरण करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिप वाघ यांनी कळविले.
विश्वास पाटील हे नवीन तंत्रज्ञानावर भर देऊन शेती करण्यासाठी आग्रही भूमिका मांडतात. ते शेतात मक्याचे एका एकरात ३५ क्विंटल, तर कपाशीचे एकरी १७ क्विंटल उत्पन्न घेतात. हे भरघोस उत्पन्न ठिबक सिंचनाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व योग्य फवारणी, खताचा व्यवस्थित पुरवठा, उत्तम मशागतीमुळे साध्य होते.
ते शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. त्यातून देखील चांगला नफा कमवून ग्राहकांना उत्तम सेवा देतात. पशुपालनामुळे शेताला सकस सेद्रीय खंत मिळते. ते शाहू, फुले, आंबेडकर आदी थोर समाजसुधारकांच्या विचारांचे प्रचारक आहेत. त्यांनी ३ वर्षां खालील मुलींना ( ० ते ३ वर्षांपर्यत) मोफत दूध वाटपाचा उपक्रम राबवला. तसेच प्रजासताक दिनानिमित्त दर वर्षी पाचोरा शहरातील गरीब, गरजूंना घोंगडी, स्वेटर, मफलर, साडी वाटपाचा कार्यक्रम घेतात. गावातील गर्भवती व प्रसुत महिलांना ते प्रवासाकरिता मोफत रिक्षा पुरवत आहेत. शेतीतील प्रगती व सामाजिक विचार लक्षात घेता त्यांना राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याला राजनंदिनी परिवारातर्फे तसेच सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.