यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे पाणी प्रश्नावरून भडका उडाला असून प्रशासनाच्या अनास्थेपायी आज आजी-माजी प्रभारी सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतची आज सर्वसाधारण मासिक सभा सुरू असतांना सुमारे हजार ते दीड हजार महीला व पुरुषांचा मोर्चा हा ग्रामपंचायतीवर येवुन धडकला. या मोर्चातील ग्रामस्थांनी सरपंच आणी ग्रामसेवक यांना गावातील पिण्याच्या पाण्याबाबत विचारणा केली. यावर ग्रामसेवक प्रविण ज्ञानेश्वर सपकाळे म्हणाले की ग्रामपंचायत प्रशासन हे आपण निवडुन दिलेल्या प्रतिनिधीच्या सहभागाने चालत असते याचा भान प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोरपावली ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य असुन यातील ७ ग्रामपंचायत सदस्य हे नियमीत मासीक सर्वसाधारण सभेला गैरहजर राहात असल्याने गावाचे कुठलेही विकास कार्य करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.
यावर प्रभारी माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की मागील ९ महीन्या पासून कोरपावली ग्रामपंचायत सरपंच पद रिक्त असुन आपल्या मिळाल्या प्रभारी सरपंच पदाच्या कार्यकाळात आपण सुमारे २५ लक्ष रुपयांचे गावातील सर्व पातळीवर विकास कामे केली आहेत. मात्र काही राजकारणी मंडळी या गावाच्या विकास कार्यात अंतर्गत राजकारण करीत असल्याने गावातील कुठल्याही विकासकामाचा आम्हास निर्णय घेता येत नसल्याने मी आणी आमच्या प्रभारी सरपंच मानिषा अकील तडवी, सदस्य सरफराज अहमद तडवी व अमोल लक्ष्मण नेहते आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्य पदाचा राजीनामा ग्रामसेवक यांच्याकडे सोपविला आहे. या चौघांच्या पवित्र्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एका वर्षापासुन कोरपावली ग्राम पंचायतीत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. खरं तर, येथील ग्रामस्थांना मुबलक पिण्याचे पाणी मिळेल अशी पर्यायी व्यवस्था आहे. मात्र त्या नियोजीत करण्यासाठी सर्व निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधी एकत्र येण्याची खरी गरज आहे. कोरपावली ग्रामपंचायतीचा कारभार यावल पंचायत समितीतुन चालत असल्याचा आरोप करून प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्याकडे ग्रामसेवक हे तिन तिन महीने ग्रामपंचायतीत येत नसल्याने अनेक ग्रामस्थांना आपल्या कामा करीता हेलपाटे खावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यातच आता आजी-माजी प्रभारी सरपंचांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.