कोल्हापूर प्रतिनिधी । जिल्हा परिषदेची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली असून अतिवृष्टी व महापुरामुळे बेघर झालेल्या कुटुंबांना नवीन घर बांधकामासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून दीड लाख रुपयांचे अर्थसहाय्यता मिळणार आहे. यासाठी २० ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत ॲपद्वारे सर्व्हे होणार असल्याची माहिती ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, गुप्ता यांनी रविवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. तसेच जिल्हा परिषदेतर्फे पूरबाधित क्षेत्रासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. महापुरामुळे नुकसान झालेल्या घरांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पडझड झालेल्या घरांच्या नवीन बांधकामासाठी अर्थसहाय्यता करण्याची सरकारची भूमिका आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर पूरग्रस्तांच्या घरकुलासाठी तत्काळ अनुदान मिळणार आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे सर्व्हेक्षण करून सरकारकडे अहवाल सादर करावा, दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगत गुप्ता यांनी दोन दिवसाच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील नुकसानीची माहिती घेतली. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी प्रशासनामार्फत राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पूरग्रस्त भागात वैद्यकीय सुविधा, पशुधनासाठी सुविधा, ग्रामीण भागात स्वच्छता मोहीमेची माहिती यावेळी दिली आहे.