जाणून घ्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील मतदारांचा कौल कुणाला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना प्रतिक्षा लागलेली असताना एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. एकीकडे देशात कोणाची सत्ता येणार याची सर्वांना उत्सुकता असताना महाराष्ट्राकडेही सर्वांचं लक्ष आहे. महाराष्ट्रातील राजकीय गुंतागुंत पाहता मतदार कोणाच्या बाजूने पारडं झुकवणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या 48 जागांचा समावेश असून मतदार महायुतीला कौल देणार की महाविकास आघाडीला हे पाहावं लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे औत्सुक्याचं आहे. दरम्यान एक्झिट पोलचे निकाल काय सांगतायत हे जाणून घ्या.

रिपब्लिक-मॅट्रीज एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात एनडीएला 30 ते 36 जागा मिळू शकतात. तसंच इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडीला 13 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना एकही जागा मिळणार नाही. टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 23 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. तर इतरांना 1 जागा मिळेल.

भाजपाला 18, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. तर मविआत काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला 6 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळतील. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 6, भाजपाला 17, अजित पवारांना 1 जागा असेल. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना 9, शरद पवारांना 6 आणि काँग्रेसला 8 अशा 23 जागा मिळतील. 1 जागा इतरांना मिळेल

Protected Content