Home Cities अमळनेर गुडघ्याएवढे खड्डे, जीवघेणा प्रवास! कळमसरे–मारवड रस्त्याची दयनीय अवस्था 

गुडघ्याएवढे खड्डे, जीवघेणा प्रवास! कळमसरे–मारवड रस्त्याची दयनीय अवस्था 

0
187

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कळमसरे ते मारवड या अवघ्या चार किलोमीटर रस्त्याचे आजचे वास्तव पाहिले, तर तो रस्ता नाही तर खड्ड्यांची मालिका वाटावी अशी परिस्थिती झाली आहे. या मार्गावर अवजड डंपरच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्ता अक्षरशः उखडून गेला असून दोन्ही बाजूंनी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. परिणामी या मार्गावर अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता दोन्ही धोक्यात आले आहेत.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पाडळसरे धरणावर मुरूम टाकण्यासाठी खेडी येथून मोठ्या प्रमाणात मुरूम वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीसाठी कळमसरे-मारवड रस्ता मुख्य मार्ग बनला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत सतत डंपरचा ओघ सुरू असतो. पाडळसरे धरणासाठी मुरूमाची आवश्यकता असल्याने ग्रामस्थांना त्या उपक्रमाविषयी हरकत नाही, मात्र अवजड डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मुरूम भरून वाहतूक केल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

या चार किलोमीटरच्या रस्त्यावर मधोमध आणि दोन्ही बाजूंना मोठे खड्डे पडले असून, पूर्वी पाच मिनिटांत पार होणारा हा रस्ता आता वीस ते पंचवीस मिनिटे लागणारा जीवघेणा प्रवास बनला आहे. वाहनचालकांना खड्ड्यांमध्ये वाहन घालणे टाळताना जबरदस्त कसरत करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि वृद्ध नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत त्रासदायक ठरतो आहे. अनेकांना पाठीचा, मणक्याचा त्रास सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

या रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून, विभागाने अद्याप या मार्गाची कोणतीही डागडुजी केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. “रस्ता शेतशिवाराचा वाटावा अशी त्याची अवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी झटकून नुसते बघ्याची भूमिका घेतली आहे”, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

दैनंदिन गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या या मार्गावरून जिवावर उदार होऊन प्रवास करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून जाणे म्हणजे एक प्रकारे आरोग्याला धोक्याची घंटा ठरत आहे. डंपर वाहतुकीवर नियंत्रण ठेवून, रस्त्याचे डांबरीकरण नव्याने दर्जेदार पद्धतीने करावे, अशी जोरदार मागणी कळमसरे व परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.


Protected Content

Play sound