जळगाव प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील किशोर चौधरी खून खटल्यातील एका आरोपीला सश्रम जन्मठेप तर तिघांना दोन वर्षाची शिक्षा आज न्यायालयाने सुनावली आहे. यावेळी तपासात गंभीर तृट्या ठेवल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फटकारले आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील चौघुले प्लॉट परिसरातील रहिवासी किशोर मोतीलाल चौधरी यांच्यावर जमावाने हल्ला करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलकर, रमाबाई सुरेश सोनवणे, वैशाली उमेश कांडेलकर, रंजनाबाई भगवान कोळी, योगीता गणेश सपकाळे, सखूबाई विश्वास सपकाळे, सागर जगन्नाथ सपकाळे, ज्ञानेश्वर भीवसन ताडे उर्फ नाना मराठे, गणेश विश्वास सपकाळे (कोळी), अंजना किशोर कोळी, भगवान बाबूराव कोळी आणि किशोर अनिल कोळी यांच्या विरूध्द शनीपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्यात सरकारतर्फे १४ तर बचाव पक्षातर्फे ४ असे एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले होते. यातील गणेश सपकाळेला जामीन मिळाला होता. तर अन्य संशयित आजपर्यंत कारागृहात होते.
यातील सुरेश दत्तराय सोनावणेला सश्रम जन्मठेप व पाच हजाराचा दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर उमेश धनराज कांडेलकर, रत्नाबाई सुरेश सोनावणे, वैशाली उमेश कांडेलकर या तिघांना २ वर्षाचा सश्रम कारावास तसेच अडीच हजाराचा दंड. तर दंड न भरल्यास १ महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपींची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. यातील सर्व आरोपींनी आतापर्यंत ३ वर्ष ८ महिने कारावास भोगलेला आहे. यातील गणेश सपकाळे हा फक्त जामिनावर बाहेर होता. तर कैलास नारायण सोनावणे या आरोपीचे नाव फिर्यादीत होते. परंतू तापसी अंमलदाराने त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केले नव्हेत.
आज दुपारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जी.ए. सानप यांनी या खटल्याच्या निकालाचे वाचन केले. यावेळी न्या.सानप यांनी पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या तपासावर ताशेरे ओढलेले आहेत. तपासात अनेक उणीवा ठेवल्या आहेत. ज्या ठिकाणी घटना झाली तेथील फोटो व्यवस्थित काढलेले नव्हते. तसेच न्यायालयातही व्यवस्थित सादर करण्यात आलेले नाही. मेडकल मेमोमध्ये अनेक त्रुटी होत्या. तर हा निकाल फक्त सीसीटीव्ही फुटेच्या आधारे देण्यात आला आहे. सरकारी वकील ऍड . केतन ढाके यांनी निकालावर असमाधान व्यक्त करत वरील न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.