जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी तत्कालीन एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरण बकाले यांचा जामीन अर्ज जळगाव कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.
आक्षेपार्ह विधान केल्यामुळे किरण बकाले हे वादाच्या भोवर्यात सापडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी उलटला असला तरी ते पोलिसांना आढळून येत नसल्याने त्यांना फरार घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ तसेच जळगाव जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, दोन्ही ठिकाणी अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
दरम्यान, संशयित आरोपी किरण बकाले यांनी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन काल अर्थात गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एस. वावरे यांनी अटकपूर्व जामीनाची मागणी फेटाळून लावली आहे. या प्रकरणात सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी प्रभावी युक्तीवाद केला.
यात त्यांनी बकालेंना उच्च न्यायालयाने हजर होण्याचे आदेश दिले असतांनाही त्यांनी याचे पालन न करत न्यायालयाचा अवमान केल्याचे नमूद केले. तसेच त्यांना ४१-अ ही नोटीस मिळाली नसतांनाही नोटीस मिळाल्याचे सांगून दिशाभूल करत असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले. यासोबत, त्यांच्या आवाजाने नमूने घेणे बाकी असल्याचेही ते म्हणाले. यावर निर्णय देतांना न्यायमूर्तींनी किरण बकाले यांच्या अटकपूर्व जामीनाची मागणी फेटाळून लावत त्यांना तत्काळ तपास अधिकार्यांकडे उपस्थित होण्याचे निर्देश दिलेत.