जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून जळगाव येथे “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम होणार असून नागरिकांना संत विचारांचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हा कार्यक्रम रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल जवळ, बापना गोशाळा, कुसुंबा, अजिंठा रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून जळगाव शहरासह परिसरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या विचारांमुळे महाराष्ट्रातील संतपरंपरा आणि वारकरी संप्रदाय अधिक बळकट झाला असून समाजात ऐक्यभाव दृढ झाला. त्यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमात प्रबोधनकार गणेश शिंदे हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यात्मदृष्टिकोनावर, समाजप्रबोधनातील त्यांच्या योगदानावर तसेच आधुनिक काळात त्यांच्या विचारांची उपयुक्तता या विषयांवर विशेष प्रबोधनपर व्याख्यान देणार आहेत. संत विचारांचे महत्त्व आणि समाजासाठी त्यांची प्रेरणा या माध्यमातून उपस्थितांना समजावून सांगितले जाणार आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. जळगाव व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, वारकरी बांधव, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.



