धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धुळे शहरातील चित्तोड रोडवरील ध्वज चौकात किरकोळ वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गौरव किरण माने (वय-२७) या तरुणावर भरदिवसा तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण धुळे शहर हादरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


घटनेच्या अधिक माहितीनुसार, ध्वज चौकातील एका पान सेंटरसमोर गौरव माने व मोबाईल सिम कार्ड विक्रेता स्टॉलधारक यांच्यात वाद झाला होता. हेडफोन गिफ्ट देण्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद विकोपाला गेला. यानंतर गौरव व स्टॉलधारक यांच्यात झालेल्या वादाने गंभीर वळण घेतले. गौरव माने तालीमकडे जात असताना संशयित आरोपी जय राजेंद्र पाकळे, ओम राजेंद्र पाकळे आणि राजेंद्र एकनाथ पाकळे यांनी त्याला अडवले. या तिघांनी संगनमत करून गौरववर हल्ला केला. जय पाकळेने चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने गौरवच्या पोटात वार केला, तर ओम पाकळेने लोखंडी हातोडीने जबर मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच धुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात हलवला. घटनेनंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला असून, संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


