अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातून एका १० वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील ताडेपुरा येथे हा १० वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबीयांसह राहतो. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या मुलाला काहीतरी आमिष दाखवून त्याचे अपहरण केले. हा प्रकार लक्षात येताच, मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, मुलाबद्दल कोणतीही माहिती न मिळाल्याने, अखेर पालकांनी अमळनेर पोलिसांत तक्रार दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पालकांनी दारू पिऊन तक्रार दिली असली तरी, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे अमळनेर शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत. पोलीस मुलाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.



