भुसावळ प्रतिनिधी । येथे उत्कर्ष कलाविष्कार आयोजित कै. देवीदास गोविंद फालक स्मृती तीन दिवसीय खान्देश नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मोहन फालक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहन फालक यांनी सांगितले की, २४ मे रोजी सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत डॉ.आशुतोेष केळकर यांच्या हार्मोनिका वादनाने महोत्सवाची सुरूवात होणार आहे. यानंतर नागपूर येथील नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते उदघाटन होईल. यानंतर नाटकघर पुणे निर्मित, माधव आचवल लिखित व दिग्दर्शित मकिमयाफ हे नाटक सादर होणार आहे. दि.२५ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक कलावंतांचा गायनाचा कार्यक्रम होईल. यानंतर सायंकाळी ७ वाजता लोकोमोशन हे स्वप्नील चव्हाण लिखित व रवींद्र लाखे दिग्दर्शित दोन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. तिसर्या दिवशी २६ मे रोजी ६.३० वाजता जळगाव येथील भूमी बहुउद्देशीय संस्था निर्मित आणि वैभव मावळे लिखित विनोदी एकांकीका मिस्टर विसरभोळे सादर होईल. त्यानंतर ७.३० वाजता पार्थ थिएटर मुंबई निर्मित पु.ल. देशपांडे यांच्या कादंबरीवर आधारीत मुकेश माचकर लिखित व मंगेश सातपुते दिग्दर्शित ममराठी वांड़मयाचा गाळीव इतिहास हा विनोद दीर्घांक सादर केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेला अनिल कोष्टी, धर्मराज देवकर आदींची उपस्थिती होती.