खामगाव प्रतिनिधी । मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास जवळपास 1 तास पावसाने हजेरी लावली होती. त्याचबरोबर आज सकाळी पावसाची 70.6 मी.ली एवढी नोंद झाली असून 1 जून ते आजपर्यंत एकूण 139.6 मी.ली. पावसाची नोंद आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझडही मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
आज झालेल्या पावसामुळे नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला असून काल संध्याकाळ पासूनच शहर व तालुक्यात सर्वत्र पावसाचे वातावरण होते. रात्री 11 वाजता खामगाव शहरामध्ये पावसात सुरुवात झाली. जवळपास सव्वा तास पावसाने हजेरी लावली. तालुक्यात सध्या 5 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. प्रामुख्याने बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. काही भागांमध्ये लिंबूवर्गीय पिके व भाजीपाला या पिकांना पावसाचा लाभ होणार आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. (दि. 26 जून) बुधवारी रोजी संध्याकाळी तालुक्यातील काही भागात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. झाडांची पडझड झाल्याने खामगाव ते माटरगाव या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याशिवाय शहरातील वामन नगर भागात काही घरांवरील पत्रेदेखील उडाली आहेत. त्यामुळेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.