Home Cities जळगाव खाजा नगर मतदार यादी वाद पेटला ; 2002 मधील वगळलेल्या नावांसाठी नागरिकांचा...

खाजा नगर मतदार यादी वाद पेटला ; 2002 मधील वगळलेल्या नावांसाठी नागरिकांचा लढा तीव्र


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील खाजा नगर परिसरातील नागरिकांना 2002 च्या मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून न्यायासाठी नागरिकांचा लढा तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही या प्रकरणाची तातडीने दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शविल्याने नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खाजा नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणात अनेक नागरिकांची नावे 2002 च्या मतदार यादीतून वगळली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायाविरोधात स्थानिक नागरिकांनी एकत्र येत निवडणूक प्रशासनाकडे निवेदन सादर केले. या निवेदनात नागरिकांनी आपली नावे वगळण्यामागील त्रुटी दूर करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

सदर निवेदन अर्चना मोरे यांना जैनुद्दीन शेख सलीम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी फारुख शेख, नदीम शेख, हारून खान, मुबिन भिस्ती आणि अफजल खान यांची उपस्थिती होती. यावेळी अर्चना मोरे यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये 1994, 1996 आणि 2004 च्या मतदार याद्यांचा समावेश असून पुनर्वसनाशी संबंधित कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. या सर्व पुराव्यांवरून संबंधित नागरिकांची नावे केवळ प्रशासकीय त्रुटीमुळे वगळली गेल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, एकता संघटना व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, लवकरात लवकर योग्य निर्णय न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. या भूमिकेमुळे प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.

प्रशासनाने उपलब्ध कागदपत्रे, ठराव आणि मतदार याद्यांचा अभ्यास करून सकारात्मक भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र अंतिम निर्णय आणि प्रत्यक्ष कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, परंतु प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण होणे गरजेचे आहे,” अशी भावना फारुख शेख यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound