मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पाच्या विस्तारामुळे वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विकासासाठी मिळणाऱ्या CSR निधीचा प्रश्न पुन्हा एकदा विधानपरिषदेत गाजला. आमदार एकनाथराव खडसे यांनी या संदर्भात अतारांकित प्रश्न उपस्थित करत प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी लावून धरली.
विधानपरिषदेत मांडलेल्या प्रश्नात खडसे यांनी नमूद केले की, दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पाची किंमत तब्बल १८०० कोटी रुपयांनी वाढली आहे. प्रकल्प खर्चात एवढी वाढ झाल्यानंतर नियमाप्रमाणे स्थानिक विकासासाठी दिला जाणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) देखील वाढवला जाणे अपेक्षित आहे. मात्र, हा निधी वाढविण्याबाबत शासनाने कोणती भूमिका घेतली आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प खर्च वाढल्याची बाब मान्य केली. कोव्हिड-१९ महामारीमुळे प्रकल्पाच्या कामांमध्ये विलंब झाला आणि त्यामुळे एकूण खर्चात वाढ झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या तरी CSR निधी त्या प्रमाणात वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, प्रकल्पाच्या ५ किलोमीटर परिसरातील विकासकामांसाठी १८.२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी केवळ ३.५९ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित सुमारे १४.४३ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असेही सांगण्यात आले.
याशिवाय, प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ३.६४ कोटी रुपये CSR अंतर्गत खर्च करण्याच्या अटीवर प्रकल्पास मंजुरी देण्यात आल्याचेही सरकारने स्पष्ट केले. मात्र, स्थानिकांच्या अपेक्षेनुसार हा निधी अपुरा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून दीपनगर परिसरातील गावांच्या विकासाचा मुद्दा ठळकपणे मांडला. प्रकल्पाचा खर्च वाढत असताना स्थानिकांच्या हक्काचा निधी का वाढवला जात नाही, हा त्यांच्या प्रश्नाचा गाभा होता. या पार्श्वभूमीवर प्रलंबित विकासकामे आणि निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
या चर्चेमुळे दीपनगर प्रकल्पग्रस्तांच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून प्रलंबित कामांना गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.



