अधिवेशनात महत्त्वाच्या प्रश्नांना संधी न मिळाल्याने खडसेंची नाराजी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपन्न होत आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असून, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापासून औरंगजेबाच्या कबरीपर्यंतच्या वादावर चर्चा झाली. दिशा सालियन प्रकरण, अबू आझमी निलंबन, प्रशांत कोरटकर अटक, नागपूर दंगल यांसारख्या मुद्द्यांनी अधिवेशन गाजले. मात्र, राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांना संधी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान एकनाथ खडसे यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सरकारला खडसावले. ते म्हणाले, “हा महत्त्वाचा प्रस्ताव असूनही सभागृहात एकही मंत्री उपस्थित नाही. शंभूराज देसाई धावतपळत आले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, सरकार किती संवेदनशील आहे, याचा अनुभव आम्ही घेत आहोत.”

खडसे यांनी पुढे भाष्य करताना सांगितले की, “या अंतिम प्रस्तावामध्ये विविध महत्त्वाचे विषय असतात. त्यामुळे काही मंत्री तरी सभागृहात असणे अपेक्षित होते. पण मंत्र्यांना रात्री उशिरा जागरण होत असल्याने सकाळी वेळेवर उठणे कठीण जात आहे का? फक्त मंत्र्यांनाच ब्रिफिंग लागतं का? आमच्याकडे कामं नसतात का?” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

एकनाथ खडसे यांच्या आरोपांना उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “विभागाकडून माहिती मिळवताना उशीर झाला, त्यामुळे मी वेळेत आलो नाही. फक्त लिफ्टमुळे दोन सेकंद उशीर झाला.” मात्र, खडसेंनी पुन्हा एकदा सरकारवर टीका करताना “सरकार किती असंवेदनशील आहे, हे यातून स्पष्ट होते,” असे म्हणत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. विधान परिषदेच्या चर्चेदरम्यान खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “राज्य आर्थिक संकटात सापडले असताना मोठ्या घोटाळ्यांचे सत्र सुरूच आहे. परिवहन, आरोग्य आणि अन्य विभागांमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. हे घोटाळ्यांचे सरकार आहे. ३२ हजार कोटींचे घोटाळे होत असताना मुख्यमंत्र्यांना त्याची माहिती आहे, हे राज्याचे दुर्दैव आहे,” असा आरोप त्यांनी केला.

Protected Content