भोसरी प्रकरण : खडसे दाम्पत्याला कोर्टाचे समन्स; उपनिबंधकाला जामीन

मुंबई प्रतिनिधी | भोसरी भूखंड प्रकरणात अटक करण्यात आलेले तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तर ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे पीएमएलए कोर्टाने एकनाथराव खडसे आणि मंदाताई खडसे यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.

भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या पाठोपाठ या व्यवहारात महत्वाची भूमिका असणारे तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांनी भोसरी येथील जमिनीचे बाजारमूल्य हे २३ कोटी रूपये असतांना खडसे यांच्या आप्तांसाठी याचे मूल्य २.७ कोटी रूपये इतके केले. यातून गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. तर एकनाथराव खडसे यांनी या सौद्यात आपल्याकडील ५० लाख रूपये मंदाताई खडसे यांच्या खात्यामध्ये वळविले आहेत. यात १५ लाख रूपये रोकडच्या स्वरूपात भरण्यात आले होते. यातील ३८ लाख रूपये भोसरी येथील भूखंडाची खरेदी करण्यात आल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. Livetrends.News

 

रवींद्र मुळे यांनी पीएमएलए कोर्टात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. यावर सोमवारी सुनावणी झाली. यात मुळे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी रवींद्र मुळे हे या प्रकरणातील थेट लाभार्थी नसून ते चौकशीत सहकार्य करत असल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. यामुळे त्यांना जामीन मिळावा अशी विनंती त्यांनी दिली. यावर न्यायालयाने रवींद्र मुळे यांना सशर्त जामीन मंजूर केला. यात त्यांनी ईडीला चौकशीत सहकार्य करावे अशी अट टाकण्यात आली आहे. यासोबत मुळे यांना त्यांचा पासपोर्ट देखील ईडीकडे जमा करावा लागला आहे. Livetrends.News

दरम्यान, या प्रकरणात सोमवारी झालेल्या सुनावणीत पीएमएलए न्यायालयाने माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना कोर्टासमोर हजर होण्यासाठी समन्स बजावले आहेत. यानुसार त्यांना गुरूवारच्या आधी न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले असून ते आपण या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात.

भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर गेल्या वर्षी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ईडीने दोनदा एकनाथराव खडसे यांची चौकशी केली आहे. तर ५ जुलै रोजी त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीत या प्रकरणात एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे, गिरीश दयाराम चौधरी आणि तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकतात.

Protected Content