केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : डॉ. उल्हास पाटील ( व्हिडीओ)

 

जळगाव, संदीप होले | उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकर्‍यांच्या हत्याकांडाला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी केली. ते कॉंग्रेसच्या आंदोलनात बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या शेतकरी आंदोलकांची भेट घेण्यासाठी जात असतांना उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आज कॉंग्रेसतर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. यात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हासदादा पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, महानगराध्यक्ष शाम तायडे, वरिष्ठ नेते डी. जी. पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून केंद्र व उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना डॉ. उल्हास पाटील यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, प्रियंका गांधी यांना असंवैधानिक पध्दतीत अटक करण्यात आलेली आहे. खरं तर उत्तर प्रदेशात जे हत्याकांड झाले, यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हेच जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा तात्काळ देण्याची गरज आहे. न्यायालयाने देखील यावर भाष्य करण्याची आवश्यकता आहे. यासोबत कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची तात्काळ सुटका करावी, या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी आणि हुतात्मा झालेल्या शेतकर्‍यांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळावी अशा मागण्या डॉ. उल्हास पाटील यांनी याप्रसंगी केल्या.

दरम्यान, याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील म्हणाले की, उत्तरप्रदेशातील शेतकरी आंदोलकांची हत्या हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. हे पूर्णपणे संविधानाच्या विरूध्द कृत्य असून जिल्हा कॉंग्रेस याचा तीव्र निषेध करत असल्याचे ऍड. पाटील म्हणाले. महानगराध्यक्ष शाम तायडे आणि ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील यांनी सुध्दा याप्रसंगी केंद्र आणि भाजप सरकारचा तीव्र निषेध केला. याप्रसंगी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

खालील व्हिडीओत पहा डॉ. उल्हासदादा पाटील आणि अन्य मान्यवर नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/399173538328264

 

Protected Content