दिल्लीत केजरीवाल जिंकतील; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये खळबळ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून देशभरात वातावरण तापलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीत फूट पडली असून आप आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. दरम्यान, यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यवर खुलासा केला आहे. काँग्रेसकडूनही त्यांच्यावर टीका झाली. ते म्हणाले, “दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे आणि मला खात्री आहे की आपण विजयी होऊ.”

अरविंद केजरीवाल यांना विरोधी इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि तृणूल काँग्रेस यांचा पाठिंबा मिळाला आहे. सप प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, जो कोणी भाजपाचा पराभव करेल आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दिल्लीत काँग्रेसची संघटना मजबूत नाही, त्यामुळे सपा आपला पाठिंबा देईल. तृणमूल काँग्रेसनेही आपला पाठिंबा देत म्हटलं की, आशा आहे की केजरीवाल दिल्लीत पुन्हा सरकार स्थापन करेल.

Protected Content