जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतातील हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केसीई सोसायटीच्या पी.जी. महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘डॉ.एम.एस. स्वामिनाथन व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ झोपे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे औपचारिक उद्धाटन करण्यात आले. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना आयर्लन्ड येथील संशोधक डॉ. सुमित लाल यांनी ‘शाश्वत विकासाकरिता जैवपदार्थांचा वापर’ या विषयावर व्याख्यान दिले, तसेच ‘परदेशातील संशोधन संधी’ यासंबंधी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात मुरुड येथील विज्ञान महाविदयालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. जावेद खान यांनी ‘जैवशास्त्रातील संप्रेरक रचना’ या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यान दिले. त्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे संशोधक स्नेहल काळे यांनी ‘किण्वप्रक्रीयेद्वारा औद्योगिक पदार्थनिर्मिती ‘ या विषयावर व्याख्यान दिले.
व्याख्यानमालेचा समारोप पुण्यातील वरिष्ठ संशोधक डॉ. विवेक जवळकोटे यांच्या ‘आरोग्य व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता आलेख’ यावरच्या व्याख्यानाने झाला. महाविद्यालयाचे जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. सारंग बारी यांच्या संकल्पनेतून आयोजित सदर व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. स्नेहल देशमुख, प्रा. दानिश शेख, आरती पाटील, पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.