
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या खान्देश कॉलेज एज्युकेशन (KCE) सोसायटीच्या ८१ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या संपूर्ण परिसरात सकाळी ९.४५ वाजता सुरू होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात सोसायटीच्या विविध शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत एकाच वेळी त्यांच्या प्रगतीची आणि कार्याची झलक सादर करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.

१९४४ मध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. ‘ज्ञान प्रसारो व्रतम्’ हे ब्रीदवाक्य अंगीकारत ही संस्था आठ दशकांहून अधिक काळ जळगाव आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवत आहे. मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेवर उभी राहिलेली ही संस्था आज २७ एकर परिसरात विस्तारलेली असून सुमारे वीस हजारांहून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. व्यवस्थापन, विज्ञान, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, कायदा, योग-निसर्गोपचार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारख्या विविध क्षेत्रात केसीई संस्था आज दर्जेदार अभ्यासक्रमांची सुविधा देत आहे.
१९४५ मध्ये स्थापन झालेले मूळजी जेठा महाविद्यालय असो, की पुढील काळात सुरू झालेले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय, एस. एस. मन्यार लॉ कॉलेज, एकलव्य क्रीडा संकुल, ओरिऑन इंग्लिश मीडियम शाळा, ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था, की डॉक्टर अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर — प्रत्येक उपक्रमाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक नवोन्मेष, समाजाभिमुखता आणि गुणवत्तेचा सातत्यपूर्ण आग्रह यामुळे संस्थेने आपले वेगळेपण जपले आहे.
सांस्कृतिक, कलात्मक आणि क्रिडा क्षेत्रातही संस्थेचा उल्लेखनीय सहभाग राहिला आहे. नृत्य, संगीत, नाट्य, चित्रकला अशा विविध कलाप्रकारांसाठी स्वतंत्र ‘कान्ह ललित कला केंद्र’ कार्यरत आहे. जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह, डिजिटल लायब्ररी अशा आधुनिक पायाभूत सुविधांसह विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
या भव्य कार्यक्रमात एकूण १७ उपक्रम सादर करण्यात येणार असून, त्यामार्फत संस्थेची आजवरची वाटचाल, शैक्षणिक यश, विद्यार्थी घडवण्याचे प्रयत्न आणि भविष्यातील ध्येयदृष्टी यांचा परिचय होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील असून, प्रमुख पाहुणे म्हणून क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विजय माहेश्वरी आणि उपकुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेच्या कार्याचा परिचय देणारी चित्रफीत सादर करण्यात येणार असून, ती संस्थेच्या गौरवशाली परंपरेचा दस्तावेज ठरणार आहे.
पत्रकार परिषदेत संस्थेच्या उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस, सांस्कृतिक समन्वयक मा. शशिकांत वडोदकर, प्राचार्य अशोक राणे, तसेच मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे यांची उपस्थिती लाभली. संस्थेच्या भविष्यातील योजना, नव्या अभ्यासक्रमांची आखणी आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संधींबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
गेल्या आठ दशकांत केसीई सोसायटीने गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संशोधनात्मक दृष्टीकोन यांचा समन्वय साधत एक ठोस शैक्षणिक चळवळ निर्माण केली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, इंदिरा गांधी, जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर अशा थोर विभूतींचे मार्गदर्शन लाभलेली ही संस्था आता राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार नवीन संधींचा शोध घेत शैक्षणिक क्षेत्रात नव्या वाटा खुल्या करत आहे.



