कासोदा (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील कासोदा ते फरकांडे लेणी रस्त्याची दूरवस्था झाली असून ग्रामस्थांना या खड्डे पडलेल्या रस्त्यावरून नाईलाजाने कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यावरील सगळ्या गावांमधील ग्रामस्थांनी वेळोवेळी याबाबत रस्ते प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे. कासोदा हे गाव परिसरातील बाजारपेठेचे मोठे गाव असून आसपासच्या लहान गावातील लोक सतत येथे येत-जात असतात, अशा परिस्थितीत रस्ता दयनीय अवस्थेत असल्याने त्यांचे मोठे हाल होत असतात. या रस्त्यावर अपघात होण्याचा धोकाही कायम असतो.
यासंदर्भात ग्रामस्थांनी नुकतीच खासदार उन्मेष पाटील यांची भेट घेवून रस्ता व इतर समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. फरकांडे येथील झुलत्या मनोऱ्यांचा पर्यटन स्थळांमध्ये समावेश करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या भेटीप्रसंगी फरकांडे येथील ग्रामपंचायत सदस्य विजय लोहार व भैय्या चौधरी, शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते गुड्डू चौधरी, रवींद्र पाटील, देवेंद्र देशमुख व शांताराम पाटील आदी उपस्थित होते.