श्रीनगर वृत्तसंस्था । उत्तर काश्मीर, काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यांमधील अनेक भागात मोठे हिमस्खलन झाले आहे. यात अनेक जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एआरटी बेपत्ता जवानांना शोध घेत आहे.
बांदीपोराच्या गुरेज सेक्टरमध्ये, तसेच कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये या हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. हे दोन्ही भाग उत्तर काश्मीरमध्ये येतात. १८ हजार फूटपेक्षा अधिक उंचीवर झालेल्या या हिमस्खलनात एकूण ४ जवान बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बेपत्ता जवानांच्या बचावकार्यासाठी लष्कराने हिमस्खलन बचाव पथक आणि लष्करी हेलिकॉप्टर्सची मदत घेतली आहे. तथापि, या शोधमोहिमेबाबत लष्कराने कोणतीही माहिती दिलेली नाही. सियाचिन ही जगातील सर्वात उंचीवर असलेली युद्धभूमी मानली जाते. तीन दिवसांपूर्वी सियाचीनच्या दक्षिण भागात झालेल्या हिमस्खलनात लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. या पूर्वी १८ नोव्हेंबरला देखील सियाचीन ग्लेशियरमध्ये झालेल्या भीषण हिमस्खलनात भारतीय लष्कराचे ४ जवान शहीद झाले होते.
आकडेवारीनुसार, सन १९८४ मध्ये आतापर्यंत हिमस्खलनाच्या घटनांमध्ये लष्कराच्या ३५ अधिकाऱ्यांसह १००० हून अधिक जवान सियाचीनमध्ये शहीद झाले आहेत. सन २०१६ मध्ये अशाच एका घटनेत मद्रास रेजिमेंटचे जवान हनुमनथप्पा यांच्याह एकूण १० जवान शहीद झाले होते. ग्लेशियरमध्ये हिवाळ्यात हिमस्खलन होणे ही सामान्यबाब मानली जाते. या बरोबरच हिवाळ्यात इथले तापमान उणे ६० डिग्री सेल्शियसपर्यंत पोहोचते.