यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन “कलाविष्कार” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाप्रकारांनी उपस्थितांची मनं जिंकली असून संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दि. २३ मार्च रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांची उपस्थिती लाभली, तर सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव शिंदे हेही विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच सौ. बेबाबाई पाटील या होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आपल्या कलागुणांचा प्रभावी आविष्कार घडवून आणला. लहानग्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांना भारावून टाकले. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्गांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात स्नेहसंमेलनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण विकसित होतात तसेच त्यांच्या स्टेजवरील आत्मविश्वासात वाढ होते, असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सावखेडा सिम, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सूर्यवंशी, सौ. आशा तडवी, सौ. पुष्पा तायडे, धीरज तायडे, निखिल संभे, शिवाजी रोहनकार, आशिष भैसार, अमोल राऊत आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गावातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.



