Home Cities भुसावळ के. नारखेडे विद्यालयात प्रेरणादायी कार्यशाळा: विद्यार्थ्यांना दिल्या अभ्यासाच्या टिप्स !

के. नारखेडे विद्यालयात प्रेरणादायी कार्यशाळा: विद्यार्थ्यांना दिल्या अभ्यासाच्या टिप्स !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळातील के. नारखेडे माध्यमिक विद्यालयात, तापी नगर, यावल रोड येथे आज “संवाद समाजाशी” या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी “अभ्यासाच्या सवयी” (Study Habits) या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना योग्य दिशा दिली.

या कार्यशाळेत डॉ. राहुल भोईटे (वरणगाव), डॉ. प्रीती पाटील (जळगाव), डॉ. सचिन देशपांडे (जळगाव) आणि डॉ. नितीन धांडे (जळगाव) या नामांकित तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवासात उपयुक्त ठरणारे बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात अभ्यासाच्या चांगल्या सवयींचे महत्त्व त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे १६० विद्यार्थ्यांनी विशेष प्रश्नावली भरून दिली, ज्याच्या सखोल विश्लेषणातून त्यांना त्यांच्या अभ्यासपद्धतीत सुधारणा करता येणार आहे. हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात मोलाचा ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर वैयक्तिक शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या सवयींचीही जाणीव करून देण्यात आली. संवादाच्या ओघात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी अतिशय मनोपूर्वक उत्तरे दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिकच वाढला.

या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. झोपे सर, शिक्षिका श्रीमती. संगीता अडकमोल, तसेच श्री. जोगी सर आणि श्री. पाठक सर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आत्मविश्वास आणि प्रेरणा स्पष्टपणे जाणवत होती.


Protected Content

Play sound