जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रस्ता अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या जखमीला न्याय मिळवून देण्यात लोक न्यायालयाची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, जळगाव जिल्ह्यातील शिरूड (ता. अमळनेर) येथील संदीप नारायण वानखेडे यांना लोक अदालतीच्या माध्यमातून तब्बल २२ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. दीड वर्षांच्या आत निकाल लागल्याने जखमी व त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ रोजी संदीप नारायण वानखेडे हे आपल्या मित्रासोबत जामनेर–अमळनेर मार्गाने दुचाकीवरून प्रवास करीत असताना धामणगाव रोडवर, पहुर पोलिस स्टेशन हद्दीत भीषण रस्ता अपघात झाला. समोरून येणाऱ्या डंपर क्रमांक एम.एच. १९ झेड ८११५ च्या चालकाने वाहन अतिशय भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात संदीप वानखेडे आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमींना भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान संदीप वानखेडे यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले, तर डंपर डाव्या पायावरून गेल्याने डावा पाय अक्षरशः चेंदामेंदा झाला. परिणामी, डॉक्टरांना मांडीपासून डावा पाय कापावा लागला. या गंभीर जखमांमुळे संदीप यांना सुमारे पाच लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च सहन करावा लागला.
या अपघातप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर चालक अर्जुन श्रावण ठाकरे याच्याविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम २७९ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले. मात्र, अपघातामुळे आलेले कायमस्वरूपी अपंगत्व आणि झालेल्या उपचार खर्चाची भरपाई मिळावी, यासाठी संदीप वानखेडे यांनी मोटार अपघात नुकसान भरपाई प्राधिकरण, जळगाव येथे मोटार वाहन कायद्यान्वये डंपर चालक, मालक आणि विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्याविरोधात दावा दाखल केला होता.
या दाव्याची नियमित सुनावणी सुरू असताना तो दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित लोक अदालतीत ठेवण्यात आला. अर्जदाराच्या वतीने अॅड. महेंद्र सोमा चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सविस्तर बाजू मांडत, उपचार खर्चासह अपंगत्वामुळे आयुष्यभर होणाऱ्या नुकसानीचा विचार करून २२ लाख रुपयांची भरपाई देण्याचा प्रस्ताव लोक न्यायालयाच्या पॅनलसमोर मांडला. चर्चेनंतर विमा कंपनीने तडजोडीअंती संपूर्ण २२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास संमती दर्शवली.
लोक अदालतीच्या पॅनल अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधीश (२) एस. एन. राजुरकर, तर पॅनल सदस्य म्हणून अॅड. शरद सोनवणे उपस्थित होते. अर्जदाराच्या वतीने अॅड. महेंद्र चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी, अॅड. हेमंत जाधव, अॅड. सुनील चव्हाण व सहकाऱ्यांनी कामकाज पाहिले, तर विमा कंपनीतर्फे अॅड. रेखा कोचुरे यांनी बाजू मांडली. दीड वर्षांच्या आत निकाल लागल्याने संदीप वानखेडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या निकालामुळे गंभीर अपघातग्रस्तांना लोक न्यायालयाच्या माध्यमातून जलद आणि प्रभावी न्याय मिळू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून अपघात पीडितांसाठी हा निर्णय मार्गदर्शक ठरणार आहे.



