न्या. अनिल किलोरांनी जाणून घेतली महावितरणच्या योजनांची माहिती

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलडाणा शहरातील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित विधी सेवा महाशिबिरात महावितरणच्या विविध योजनांचा जागर करण्यात आला. या शिबिरात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (नागपूर खंडपीठ) श्री. अनिल किलोर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे यांनी महावितरणच्या माहिती स्टॉलला भेट दिली. त्यांनी महावितरणच्या योजनांची माहिती घेत ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेले पोस्टर्स, पाम्प्लेट्स आणि पुस्तिकांचे निरीक्षण केले. या वेळी जिल्हाधिकारी किरण पाटील आणि पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी देखील स्टॉलला भेट देऊन महावितरणच्या विविध योजनांविषयी माहिती घेतली.

महावितरणच्या विविध योजनांचा लाभ वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण यांच्या पुढाकाराने माहिती स्टॉल लावण्यात आला.

महत्वाच्या योजना
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना – विजबिल शून्य करण्यासाठी ७८,००० रुपयांपर्यंत अनुदान
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना – अनुसूचित जाती-जमातीसाठी ९५% आणि इतरांना ९०% अनुदान
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० – शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा
थकबाकीमुक्ती योजना – व्याज आणि विलंब आकारात संपूर्ण सवलत, सहा हप्त्यात थकीत वीजबिल भरता येणार

महावितरणच्या माहिती स्टॉलला शेतकरी, वीज ग्राहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने भेट दिली. उपकार्यकारी अभियंता विनोद गुबे, डि.एल. लांबट, सहायक अभियंता निंबाळकर, सहाय्यक लेखापाल मुंडलिक तसेच शहर आणि ग्रामीण वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी योजनांची माहिती देत नागरिकांचे शंका समाधान केले. महावितरणच्या या उपक्रमामुळे वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्याची संधी मिळाली.

Protected Content