सातारा प्रतिनिधी । वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या बाजुला असलेला आडोशाला जुगार खेळणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हे सर्वजण वाढे फाटा येथील एका दुकानाच्या गोडाऊनच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेला मिळाली असताच, या शाखेच्या टीमने गुरुवारी रात्री 8 वाजता तेथे अचानक छापा टाकला. त्यावेळी हे सर्वजण जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्याकडून पत्त्याची पाने, मोबाईल, 5 मोटारसायकली, पत्त्याच्या डावातील रोख रक्कम, टेबल, खुर्च्या असा एकूण ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. शैलेश दिनेश पटेल (वय २९, रा. केशव कॉम्पलेक्स वाढे फाटा, सातारा), नीलेश विकास भांडे (वय २८, गुरूदत्त कॉलनी विकास नगर सातारा), सुमीत राजेंद्र पवार (वय ३०), ओंकार अजय साळुंखे (वय २६, रा. वाढे फाटा, सातारा), चंद्रकांत लक्ष्मण साळुंखे (वय ३७, रा. सैदापूर फाटा, सातारा), रियाज उस्मान शेख (वय ४९, गुरूवार पेठ सातारा), अशोक विष्णू कांबळे (वय २७, रा. विकास नगर खेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन.एस.कदम, सहायक फौजदार वाघमारे, साबळे, भोसले, पंकज ढाणे, ओंकार डुबल यांनी केली आहे.