मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ ते कोथळी रस्त्यावरील एका जीवघेण्या खड्ड्याने गेल्या काही दिवसांपासून वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना सतत त्रस्त केले आहे. या ठिकाणी अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अखेर, या निष्क्रियतेला कंटाळून पत्रकार बांधवांनीच पुढाकार घेत हा खड्डा स्वतः बुजवण्याचा निर्णय घेतला आहे.
या खड्ड्यामुळे दररोज वाहनचालकांना अपघाताच्या भीतीने प्रवास करावा लागत होता. स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना तसेच रुग्णवाहिकांनाही या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. इतक्या गंभीर समस्येवर सत्ताधारी, प्रशासन आणि संबंधित विभाग गप्प का आहेत? असा सवाल नागरिक सातत्याने उपस्थित करत होते. अनेक पत्रकारांनी बातम्यांद्वारे ही समस्या वारंवार मांडली, पण केवळ फाईल फिरवण्यापलीकडे काहीच घडलं नाही.

यामुळे अखेर पत्रकारांनी “फक्त बातम्या करून उपयोग नाही, आता कृती हवी” या भावनेतून पुढाकार घेतला आहे. मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, भुसावळ रस्त्यावरील हा जीवघेणा खड्डा पत्रकार बांधव स्वतःच्या प्रयत्नातून बुजवणार आहेत. केवळ जनतेचा आवाज बनण्यापुरते न राहता, पत्रकारांनी यावेळी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत प्रत्यक्ष कृती करण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमासाठी पत्रकारांनी स्वतःची आर्थिक जबाबदारी घेतली असून, स्थानिक तरुणांनाही यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उदाहरणाने संपूर्ण परिसरात सकारात्मक संदेश गेला आहे. नागरिकही या उपक्रमाचे स्वागत करत आहेत. त्यांच्या मते, “ही कामगिरी खरंतर प्रशासनाची होती, पण पत्रकारांनी ती निभावली. आता तरी प्रशासन जागं होईल का?”
या उपक्रमामुळे ना फक्त समाजाला प्रत्यक्ष कृतीचा संदेश मिळाला, तर प्रशासनालाही एक आरसा दाखवण्यात आला आहे. यापुढेही अशा स्वरूपाच्या प्रश्नांवर फक्त चर्चा न होता कृती होण्याची गरज आहे, हे या पत्रकारांनी अधोरेखित केले आहे.



