Home Cities पारोळा पत्रकारांच्या स्वाभिमानाला मिळाली हक्काची ओळख – आ. अमोल पाटील 

पत्रकारांच्या स्वाभिमानाला मिळाली हक्काची ओळख – आ. अमोल पाटील 

0
113

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक भक्कम करण्याच्या दिशेने पारोळा शहरात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले असून, लोकदर्पण पत्रकार असोसिएशनच्या बहुप्रतिक्षित पत्रकार सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आज उत्साहात पार पडले. पत्रकारांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाल्याने शहरातील पत्रकार बांधवांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण होते.

शहरातील लोकदर्पण पत्रकार असोसिएशनच्या गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या सभागृहाच्या मागणीला आमदार अमोल पाटील यांच्या ठोस आश्वासनामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला आहे. पत्रकार संघाच्या सभागृहासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून उभारण्यात येणाऱ्या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच नगरसेवकांचा सत्कार सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, पारोळा पोलीस निरीक्षक अशोक पवार, ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष मनोहर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती विजय सुदाम पाटील, शेतकी संघाचे साहेबराव पाटील, वंजारी गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकदर्पण पत्रकार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे तसेच नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात लोकदर्पण पत्रकार असोसिएशनच्या कार्याचे कौतुक करत पत्रकारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पत्रकार सभागृहाच्या माध्यमातून पत्रकारिता अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

आमदार अमोल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या सन्मानासाठी उभारले जाणारे हे सभागृह संविधान, सत्य, निर्भीडता आणि जनतेच्या प्रश्नांचा आवाज अधिक बुलंद करेल. अनेक वर्षांपासून पत्रकार बांधवांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती. अनेकांनी केवळ पोकळ आश्वासने दिली; मात्र दिलेला शब्द पूर्ण करून ही मागणी प्रत्यक्षात साकारण्याचे भाग्य मला लाभले, याचे मनापासून समाधान आहे. हे सभागृह केवळ इमारत नसून पत्रकारांच्या विचारांना, संघर्षाला व स्वाभिमानाला मिळालेली ओळख आहे.” पारोळा शहराच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे असून पुढील काळातही हे सहकार्य असेच कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा यथोचित सत्कार केल्याबद्दल आमदार पाटील यांनी लोकदर्पण पत्रकार असोसिएशनचे आभार मानले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांनी एकदिलाने आणि एकमताने काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

हा संपूर्ण सोहळा म्हणजे पत्रकारिता, लोकशाही आणि विकास यांचा त्रिवेणी संगम ठरला असून, येत्या काळातही लोकदर्पण पत्रकार असोसिएशनच्या कार्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे मत आमदार अमोल पाटील यांनी स्पष्ट केले. या भूमिपूजन सोहळ्याचे प्रास्ताविक लोकदर्पणचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले, सूत्रसंचालन दीपक भावसार यांनी पार पाडले, तर उपस्थितांचे आभार असोसिएशनचे उपाध्यक्ष भूपेंद्र मराठे यांनी मानले.

एकूणच, पत्रकारांच्या हक्काच्या व्यासपीठाला आकार देणारा हा ऐतिहासिक क्षण असून, नव्या सभागृहाच्या माध्यमातून पारोळ्यातील पत्रकारिता अधिक सक्षम, संघटित आणि निर्भीड बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound