पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक १, संतोषीमाता नगर येथील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाकडे वारंवार तोंडी तसेच लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

या खड्ड्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असतानाही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर एका पत्रकाराने गांधीगिरीचा मार्ग अवलंबत स्वतःच पुढाकार घेत खड्डा बुजवून घेतला.

आर. एल. न्यूज पहूरचे संपादक तथा देशदूतचे पत्रकार रवींद्र लाठे यांनी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शांततामय निषेध नोंदवत स्वखर्चाने व स्वतःच्या प्रयत्नातून मुख्य रस्त्यावरील खड्डा बुजवून नागरिकांना दिलासा दिला. त्यांच्या या कृतीमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर ग्रामपंचायतीने तरी रस्त्यांची दुरुस्ती व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



