Home Cities जळगाव डीपीडीसी बैठकीला पत्रकारांना प्रवेशबंदी, खेळाडूंचा सन्मान बाहेरच, पालकांचा संताप !

डीपीडीसी बैठकीला पत्रकारांना प्रवेशबंदी, खेळाडूंचा सन्मान बाहेरच, पालकांचा संताप !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जानेवारी महिन्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जळगाव येथील जिल्हा नियोजन सभागृहात डीपीडीसी (जिल्हा नियोजन समिती) ची बैठक पार पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंत्री संजय सावकारे, आ.अमोल पाटील, आ.अमोल जावळे, आ.किशोर पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीपासून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले. दुसरीकडे, सर्व आमदारांचे सोशल मीडिया हँडलर आत उपस्थित होते, यामुळे माध्यमांमध्ये आणि नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनी खेळाडूंचा अनादर
आज राष्ट्रीय क्रीडा दिन असल्याने, जिल्हाभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण डीपीडीसीची बैठक त्याच ठिकाणी असल्याने, खेळाडूंचा सत्कार नियोजन भवनाच्या बाहेरच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा असा सन्मान झाल्याने पालकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या मते, हा खेळाडूंच्या आणि खेळाच्या उत्साहाचा अनादर आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
एकीकडे माध्यमांना प्रवेश नाकारणे आणि दुसरीकडे खेळाडूंचा सन्मान बाहेर करणे, या दोन्ही घटनांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती, पण माध्यमांनाच दूर ठेवल्याने नेमके काय निर्णय घेण्यात आले, याबाबत स्पष्टता नाही. या प्रकारामुळे पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Protected Content

Play sound